Pune District : खाकी वर्दीचे स्वप्न अधुरेच
Pune District : या प्रकारामुळे भाग्यश्री मानसिक तणावाखाली होती, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. अखेर 10 ऑगस्ट रोजी तिच्या राहत्या ठिकाणी ती मृतावस्थेत आढळून आली. घटनेनंतर तिची बहीण शितल भंडारी यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आळेफाटा : पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आळेफाटा येथे पोलीस भरतीची तयारी करणार्या 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. भाग्यश्री भास्कर भंडारी (रा. आळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने सोमवारी (दि. 10) राहत्या ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सह्याद्री अकादमीतील शिक्षक मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री ही पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने आळेफाटा येथे राहून तयारी करीत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा राग मनात धरून संबंधित शिक्षकाकडून भाग्यश्रीला लक्ष्य केले जात होते. वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर तिच्याशी अपमानास्पद वर्तन करण्यात येत होते आणि तिचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे भाग्यश्री मानसिक तणावाखाली होती, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. अखेर 10 ऑगस्ट रोजी तिच्या राहत्या ठिकाणी ती मृतावस्थेत आढळून आली. घटनेनंतर तिची बहीण शितल भंडारी यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
शीतल भंडारी यांच्या फिर्यादीवरून शिक्षक मयुर डुंबरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 108 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.
प्रशिक्षण संस्थांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणार्या तरुण-तरुणींवर अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण, अपेक्षा आणि भविष्यातील अनिश्चिततेचा मोठा ताण असतो. अशा परिस्थितीत प्रशिक्षक, शिक्षक आणि पालकांची भूमिका केवळ प्रशिक्षण देण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याचीही असते. शिस्त आणि कठोर प्रशिक्षण आवश्यक असले, तरी अपमान किंवा मानसिक दबाव हा प्रशिक्षणाचा भाग होऊ नये. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही प्रशिक्षण संस्था आणि पालकांनी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.





