कोयनावासीयांचे सुपर मार्केटचे स्वप्न कागदावरच

विजय लाड
कोयनानगर – कोयना प्रकल्पाने सहा दशकात गरुडभरारी घेतली आहे. राज्याला अब्जावधी रूपयांचा निधी मिळवून देणाऱ्या आयएसओ मानांकन प्राप्त कोयना प्रकल्प कोयनानगरला आहे. सोन्याची अंडी देणारा हा प्रकल्प कोयनानगरला असला, तरी कोयनानगर हे बकाल अवस्थेतच आहे. जलसंपदा विभागाची मालकी असलेल्या या परिसरात कोयना प्रकल्प व महानिर्मीती कंपनी सीएसआर वापरत नसल्याने कोयना विकासापासून कोसो दूर राहिले असून मोडकळीस आलेल्या कोयना बाजारपेठेचे “सुपरमार्केट’ हे दिवास्वप्नच राहिले आहे.
कोयना धरणाची देखभाल व दुरूस्तीसाठी कोयनानगर येथे शासकीय वसाहत आहे.
या वसाहतीबरोबर जवळपास असणाऱ्या गावांसाठी कोयनानगर जूने मार्केट व नवीन मार्केट येथे कोयना प्रकल्पाने व्यापारी बाजारपेठ बसवली. परंतु, सहा दशकापासून या बाजारपेठेची कोणतीही डागडुजी व दुरूस्ती न केल्यामुळे ही बाजारपेठ मोडकळीस आली आहे. त्यात कोयना धरण व्यवस्थापन व्यापाऱ्यांना बाजारपेठ व व्यापारपेठ स्वतः दुरुस्त करायला परवानगी देत नसल्याने मोडकळीस आलेल्या या बाजारपेठेत व्यापारी जिव मुठीत घेवून राहत आहेत. तसेच दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारतळ सुध्दा मोडकळीस आला आहे. भाजीमंडईमध्ये व्यापाऱ्यांना बसण्यासाठी उभारलेले गाळे गंजले असून ते कधीही भुईसपाट होवू शकतात.
आठ “महिने मळके, तर चार महीने गळके’ असणारी ही भाजीमंडई अखेरच्या घटका मोजत आहेत. हा परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. कोयना प्रकल्प हा बाजारतळ दुरुस्त करून देण्यास निधी नसल्याचे तुणतुणे लावत आहे. प्रकल्पात असलेली स्वच्छता शाखाही कुचकामी आहे. कोयना ग्रामपंचायत दर आठवड्याला बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कर गोळा करत असली, तरी सुविधांच्या नावाने बोंबाबोंबच आहे. कोयनानगरला महानिर्मिती कंपनीचा पायथा वीजगृह व कंपनीची कामगार वसाहतही आहे. पॉवर हाऊस ते कामगार वसाहत यादरम्यानच्या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी महानिर्मिती कंपनीची आहे. यासाठी महानिर्मीती कंपनी निधी देत असून कामगार वसाहत सोडली, तर हा निधी इतर कुठेही वापरला नसल्याचे चित्र आहे.
“टॉट’ कलमान्वये अधिकाऱ्यांवर कारवाई…
सेंट्रल गव्हर्मेंट कमिशनचा 2 टक्के सीएसआर कोयना प्रकल्पाला आहे. तर महानिर्मिती कंपनीचा 2 टक्के सीएसआर असल्याची माहीती कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता यांनी दिली. कोयना प्रकल्पात काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला सामाजिक बांधिलकी नसल्याने कोयनेची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेला कोयनेत नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे अधिकारीच जबाबदार असून अशा अधिकाऱ्यांवर टॉट कलमान्वये कारवाई होवू शकते.





