Ajit Pawar NCP : रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर महायुतीतील (भाजप-शिवसेना) यशामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील सात ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीने दबदबा निर्माण केला असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) महायुतीतून ‘नो एन्ट्री’चे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी चिपळूण येथील युतीच्या मेळाव्यात हे स्पष्ट केले. काय म्हणाले उदय सामंत? चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करण्याची इच्छा होती, पण ते ठराविक जागांवर अडून बसल्याने महायुती शिवसेना-भाजपने स्वतंत्र लढत दिली आणि १६ जागा जिंकून सत्ता काबीज केली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. उदय सामंत म्हणाले, चिपळूणमध्ये आम्ही राष्ट्रवादीची फसवणूक केली नाही, तर ते स्वतःच अडून बसले. हाच पॅटर्न आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राबवला जाईल. रत्नागिरी, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर, खेड आणि राजापूरमध्ये युतीला मोठे यश मिळाले. रत्नागिरी पालिकेत राष्ट्रवादीने उमेदवार दिले तरी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. जिल्ह्यात महायुती योग्य निर्णय घेईल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दरवाजे बंद असतील, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे. शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण चव्हाण यांचा टोला शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी म्हटले, चिपळूणमध्ये कोणी कोणाला फसवले हे मतदारांनी दाखवून दिले. राष्ट्रवादी ज्या जागांवर अडून बसली, तिथे मोठ्या फरकाने पराभूत झाली. यातून त्यांनी बोध घ्यायला हवा. युतीच्या योग्य नियोजनामुळे यश मिळाले आणि मतदारांचा विश्वास सार्थ ठरला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा तापली राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. पुण्यात दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता वाढली असून, शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी याला विरोध करत राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, महायुतीत अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर विरोध वाढत आहे. चिपळूण पालिकेत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला होता, पण निकालात अपयश आले. या घटनेमुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला महायुतीबाहेर राहावे लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे शिवसेना-भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आहे.