पुणे | डॉक्टर फसले, तब्बल दिड करोडचा गंडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सायबर चोरट्यांकडून शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजमधील (एएफएमसी) एका डॉक्टरांची तब्बल एक कोटी २२ लाख ५३ हजार ४१० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जेवढी जास्त रक्कम गुंतवण्यात येईल तेवढा अधिक नफा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखविले होते.
याप्रकरणी ३२ वर्षीय डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै ते २६ ऑगस्ट २०२४ या दरम्यानच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. फिर्यादी हे एएफएमसी मध्ये डॉक्टर म्हणून काम करतात.
सायबर चोरट्याने फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंग संदर्भात एक मेसेज पाठवून शेअर मार्केटच्या गृप संदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांना एका व्हॉटसऍप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. या ग्रुपमध्ये ११० सदस्य होते. यातील सदस्य ग्रुपवर फोटो टाकून मोठ्या प्रमणात नफा होत असल्याचे सांगत होते.
यानंतर फिर्यादी यांच्या मोबाइलवर लिंक पाठवून एसएमएस कॅपीटल नावाचे ऍप डाउनलोड करायला लावले. त्या ऍपच्या माध्यमातूनच शेअर खरेदी करायला लावण्यात येत होते. जास्त प्रमाणात गुंतवणूक केली तेवढ्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.
यामुळे फिर्यादी यांना विश्वास वाटत होता. यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या बँक खात्यातुन ऑनलाईल ३४ ट्रान्झॅक्शन करुन सायबर चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी २२ लाख ५३ हजार ४१० रुपये पाठविले.
फिर्यादी यांनी डाउनलोड केलेल्या एसएमएस कॅपीटल या ऍप मध्ये त्यांना १० कोटी २६ लाख ५४ हजार ४८ रुपयांचा फायदा झाला असल्याचे दिसत होते. यामुळे फिर्यादी यांनी हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते काढता येत नव्हते.
यावेळी सायबर चोरट्यांकडून सांगण्यात आले की, पैसे काढायचे असल्यास झालेल्या नफ्यावर ५ टक्के म्हणजेच ४६ लाख ४५ हजार ८५६ रुपये भरावे लागतील तो पर्यंत तुमची रक्कम गोठवण्यात येत आहे.
यानंतर फिर्यादी यांना झालेल्या नफ्यातून २० लाख रुपये घेवून बाकी परत देण्यात यावेत, असे सांगितले. मात्र सायबर चोरट्यांकडून ही मागणी फेटाळून लावत परत ४६ लाख भरण्यासाठी सांगण्यात आले.
यानंतर फिर्यादी यांना संशय वाटल्याने सायबर चोरट्यांनी दिलेल्या दिल्ली येथील पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता अशा प्रकारची कंपनी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.



