Satara: जिल्हा बँकेचा अध्यक्ष साताऱ्यामध्येच ठरणार; ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara राज्यात आणि जिल्ह्यात आपण महायुती म्हणून एकत्र काम करत असताना घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपवर खोटेनाटे आरोप होणे दुर्दैवी आहे. या प्रकाराची महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनीही गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

Satara: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात आली असून, अध्यक्षपदाचा निर्णय जिल्ह्यातील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन साताऱ्यातच घेतला जाईल. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जावळी तालुक्याती पत्रकार परिषदेत मांडली.
दरम्यान, जावळीच्या विकासात कोणी आडवे आल्यास किंवा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) नेत्यांना दिला. जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांचा झालेला विजय विरोधकांना पचनी पडलेला नाही. त्यातूनच खोटा बनाव रचून त्यांच्या विजयी मिरवणुकीत गोंधळ घालण्यात आला आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.’
राज्यात आणि जिल्ह्यात आपण महायुती म्हणून एकत्र काम करत असताना घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपवर खोटेनाटे आरोप होणे दुर्दैवी आहे. या प्रकाराची महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनीही गंभीर दखल घेण्याची गरज आहे. गलिच्छ राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी ठणकावले. ‘तुम्ही तुमच्या पद्धतीने विकासाची कामे करा, आम्ही आमची कामे करू. मात्र, जावळीच्या विकासकामांत कोणी आडकाठी आणल्यास किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास माझे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.





