सातारा, (प्रतिनिधी)- लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले असून मतदार जनजागृतीसह विविध प्रकारची प्रशिक्षणे घेण्याचा सपाटा जिल्हा प्रशासनाने लावला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत वारंवार आढावा घेऊन प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लावली आहे. सातारा मतदारसंघ व माढा मतदारसंघाचा काही भाग सातारा जिल्ह्यात येत असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांसाठी असणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ज्याठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखालील स्विप कक्षाच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महिलांचा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न कऱण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकाराने निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे करायचे आहे ते प्रशासन युध्दपातळीवर करताना दिसत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे व विनातक्रार पार पडावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दिव्यांग मतदान, पोस्टल मतदानामधून मताचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन काम करत आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्व हद्दींवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी यासाठी पोलिस विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. एकंदर जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.