पवना धरणाच्या विसर्गात वाढ

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पवनानगर, दि. २६ (वार्ताहर) – पवना धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने धरणातून पवना नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. धरणातून सुरू असलेला ७,५५० क्युसेक विसर्ग वाढवून ९,००० क्युसेक करण्यात आला आहे. तसेच पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १२,००० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असल्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण प्रकल्पाने रविवारी (दि. २६) दुपारी २ वाजता हा इशारा जारी केला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे ओढे, नाले आणि पवना नदीची पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या सखल भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
त्यामुळे नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे तसेच तालुका, जिल्हा व शहर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.





