अकोले – जिल्ह्याची चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडीमध्ये काल बुधवारी थोडा मंदावल्यानंतर आज पुन्हा जोरदार पाऊस झाला. भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटने निळवंडे धरणात सोडण्यात आल्याने निळवंडे धरण 56 टक्के भरले आहे. सायंकाळी 6 वाजता 8, 833 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला असून, रात्रीतून विसर्ग वाढवण्यात येईल.
अकोले शहर व इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. बुधवारी दिवसभर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस नव्हता. आज गुरुवारी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील मुतखेल, मुरशेत, उडदावणे, पांजरे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, भंडारदरा आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने ओढ्यानाल्यांना पूर येऊन भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
सकाळी 6 पासून सायंकाळी 6 पर्यत 12 तासांत 300 द.ल.घ.फू.नवीन पाण्याची आवक झाल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9, 257 द.ल.घ.फू (84टक्के) कायम ठेवून धरणातून सायंकाळी 6 वाजता 8,833 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या पण्याच्या मोठ्या विसर्गाने निळवंडे धरणाचा पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. निळवंडे धरणाचा सायंकाळी 6 वाजेपर्यत 4, 636 द.ल.घ.फू पाणीसाठा होऊन धरण 56 टक्के भरले आहे.
भंडारदरा परिसरात सुरू असलेल्या पावसाने निसर्गाने मनमोहक रुप धारण केले आहे. भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटने मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने फेसाळणाऱ्या पाण्यासह निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागात येत आहे.