संदीप घिसे पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात सत्तेच्या समीकरणांवर आधारीत हालचालींना वेग आला आहे. विचारधारा आणि पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेच्या जवळ राहणे अधिक फायदेशीर ठरते, अशी मानसिकता अनेक इच्छुकांमध्ये दिसू लागली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात “कोणता गट सत्तेत येईल?” या अंदाजावर उमेदवारीची दिशा ठरत आहे. बदल्या राजकारणानुसार कार्यकर्त्यांचे गट आणि पक्षनिष्ठा देखील बदलताना दिसत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व आहे. मात्र महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांनी आपण स्वतंत्ररित्या निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले आहे. मात्र शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी आम्ही १२८ जागांसाठी तयारी केली असल्याचे सांगितले. अनेक इच्छुकांनी युतीला झुकते माप दिले आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीचे परंपरागत कार्यकर्ते स्वतःच्या प्रभागातील विजयाची शक्यता लक्षात घेऊन भूमिकांमध्ये बदल करत आहेत. सत्तेच्या केंद्राशी जोडले गेल्यास विकासकामांना निधी मिळतो, प्रकल्पांना गती मिळते, आणि मतदारसंघात ‘काम करणारा’ चेहरा म्हणून ओळख निर्माण होते. या भावनेने अनेक संभाव्य उमेदवार आपली दिशा ठरवत आहेत. परिणामी, शहरात “सत्ता कुठे?” हा प्रश्न विचारधारेपेक्षा महत्त्वाचा ठरतो आहे. महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचना लागू असल्याने, राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. प्रत्येक प्रभागात विविध पक्षांच्या गटांमध्ये ‘समायोजन’ सुरू असून, काही ठिकाणी प्रतिस्पर्धी गटात सामील होऊन कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वाची सुरक्षितता साधण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील राजकारणात गटबाजी, स्थानिक प्रभाव आणि निधीची उपलब्धता या तिन्ही घटकांवर उमेदवारांची दिशा अवलंबून राहते आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याने, सर्वच पक्षांचे स्थानिक नेते आणि संभाव्य उमेदवार सक्रिय झाले आहेत. कुणी युतीकडे, तर कुणी विरोधकांकडे झुकत असताना, काही स्वतंत्र गटांनीही स्वतःचे राजकीय समीकरण रचण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा कल थेट प्रभागातील प्रभावशाली गटांकडे दिसत असून, पक्षीय निष्ठा ही केवळ औपचारिकतेपुरती उरली आहे. विचार आणि मूल्ये बाजूला पडून सत्ता व विकासाच्या नावाखाली राजकीय दिशा ठरवली जात आहे. ‘सत्ता’ ठरवणार निवडणुकीचा परिणाम बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने कार्यकत्र्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत सत्तेच्या समीकरणांवर आधारित लढती रंगणार हे स्पष्ट होत आहे. कोणाचा विचार बरोबर, यापेक्षा कोण सत्तेच्या जवळ आहे, यावर मतदारसंघातील उमेदवारी ठरण्याची चिन्हे आहेत. शहरात सध्या “सत्तेचा सोपान जिकडे, उमेदवारीची दिशा तिकडे” हेच वास्तव ठरले असून, या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची लढत फक्त पक्ष विरुद्ध पक्ष एवढी मर्यादित राहणार नाही; तर ती “प्रतिष्ठा विरुद्ध परिस्थिती” अशी ठरणार आहे.