हिरे उद्योग संकटात

मुंबई – भारत कच्चे हिरे आयात करून त्याला पैलू पाडणारा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. मात्र यातील बरेच हिरे रशियातून आयात केले जातात. युद्धामुळे या आयातीवर परिणाम होण्याची भीती भारतातील हिरे उद्योगाने व्यक्त केली आहे.
लॉक डाऊनच्या काळात हिरे उद्योगावर प्रचंड परिणाम झाला होता. आता यातून हा उद्योग सावरत असतानाच रशिया -युक्रेन युद्धामुळे या उद्योगासमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. रशियामधील अलरोसा ही कंपनी जगाला 30 टक्के कच्च्या हिऱ्यांचा पुरवठा करते. भारतात या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या हिऱ्याची आयात केली जाते. भारत हा पैलू पाडलेल्या 80 ते 90 टक्के हिऱ्यांचा पुरवठादार देश म्हणून ओळखला जातो.
यावरून भारताचे या उद्योगातील महत्त्व अधोरेखित होते. सध्या तरी हिरे आयात करण्यावर व आयातीचे पेमेंट करण्यावर कसलाही परिणाम झालेला नाही. मात्र भविष्यामध्ये परिणाम होण्याची आम्हाला भीती आहे, असे दागिने निर्यातदार प्रोत्साहन परिषदेचे कार्यकारी संचालक सबयासची रॉय यांनी सांगितले.
युद्ध सुरू होण्यापूर्वी आम्ही दोन महिने अगोदर रशियाच्या कंपनीकडे कच्च्या हिऱ्यासाठी ऑर्डर नोंदविल्य होत्या. सध्यातरी अलरोसा कंपनीवर कसलेही निर्बंध नाहीत. मात्र भविष्यामध्ये निर्बंध घातले जाऊ शकतात. या कंपनीवर निर्बंध नसले तरी या कंपनीला ज्या बॅंकांच्या माध्यमातून पैसे पाठविले जातात. त्या बॅंकांवर निर्बंध असल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या उद्योगावर परिणाम होणार आहे.
भारतातील हिरे उद्योग हा पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून आहे. यावर्षी 24 अब्ज डॉलरची निर्यात होण्याची शक्यता होती. मात्र युध्दामुळे या सर्व समीकरणावर परिणाम झाला आहे. सध्याच्या तिमाहीवर या युद्धामुळे परिणाम होणार आहे. हे युध्द लवकर संपेल अशी आशा या उद्योगाने व्यक्त केली आहे.

