वाघोली : मी ठामपणे सांगतो, महापालिकेच्या विकासाची गाडी आता थांबणार नाही. शंभरच्या वेगाने विकास साधण्याचा माझा निर्धार आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या प्रत्येक मुद्द्यावर प्रत्यक्ष कामातून उत्तर दिले जाईल, असे ठाम आश्वासन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, केवळ घोषणा नव्हे, तर ठोस परिणाम देणारे निर्णय हीच भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. प्रत्येक प्रभाग, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि भाजपची विकासाची स्पष्ट दृष्टी याच्या बळावर पुणे शहराला अधिक सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वासही मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. या सभेस प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील सर्व अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युती) पॅनलच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवारांचा बारामाशेल, विमाननगर परिसरात भव्य पदयात्रा प्रचार दौरा उत्साहात पार पडला. या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. या पदयात्रेत श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि रामदास दत्तात्रय दाभाडे हे भाजपचे चारही अधिकृत उमेदवार कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मायबाप जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमचा आत्मविश्वास अधिक दृढ करणारा आहे. विकास, पारदर्शक प्रशासन आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीचा ठाम संकल्प आम्ही केला आहे. सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध शहर घडवण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद द्यावा. -रामभाऊ दाभाडे, उमेदवार, प्रभाग क्रमांक 3