नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर निर्णय देत त्या जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले होते. तर बाबरी मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बाबरी मशिदीच्या कामालाही लवकरच सुरूवात होणार आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे डिझाईनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केले आहे. अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यात आलेली आहे. मशिदीचे भव्यदिव्य संकल्पचित्र फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, मशिदीबरोबरच एक रुग्णालयाही उभारण्यात येणार आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील (स्थापत्य कला) प्रा.एस.एम.अख्तर यांनी मशिदीचे संकल्पचित्र तयार केले आहे. तयार करण्यात आलेल्या आरेखनाला संबंधित विभागाकडून वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या, तर २६ जानेवारीपासून काम सुरू होऊ शकते. मात्र, जर वेळेत परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.
मशिदीच्या शेजारीच रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे ट्रस्टने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. या पाच एकर जागेवर इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर), धर्मदाय रुग्णालय, कम्युनिटी किचन, संग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.