Nagar | सुपारी बाज नेते गेल्याने काहीच फरक पडणार नाही – विजयसिंह गोलेकर

जामखेड, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष असताना राळेभात यांनी पक्ष वाढीसाठी कुठले ही योगदान दिले नाही. उलट गटबाजीस खतपाणी घालण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने कुठलाही फरक पडणार नाही.
गटबाजी करणारे सुपारी बाज नेते गेल्याने आ.रोहित पवार यांच्या निवडणुकीच्या निकालावर काहीच फरक पडणार नसून येथे झालेल्या सर्व विकास कामांच्या जोरावर सर्वसामान्य जनता आ. पवार यांच्या बरोबर राहणार असल्याचे निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिला.
प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे जाहीर करत आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जामखेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दत्तात्रय वारे म्हणाले की, आ रोहित पवार यांनी कायम कार्यकर्त्याना विश्वासात घेऊनच नेहमी सन्मानाची वागणूक दिली आहे, मात्र ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नाहीत, ते जातीयवाद करतात हे त्यांच्याविरुद्ध आरोप धादांत खोटे आहे. सर्व जातीं-धर्माच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा सतत प्रयत्न केला केला असल्याचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे म्हणाले.
जामखेड विकास आराखड्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असून त्यासाठी आ. पवार यांच्याकडून वकिलांची फौज उभे करण्यात येईल. त्यासाठी लोक वर्गणी करण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात यांनी सांगितले.
पक्षातले आऊट गोइंग संपले असून आता पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती माजी सभापती सूर्यकांत मोरे यांनी दिली.
आ. पवार हे अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून विकास कामांचे सुयोग्य नियोजन करतात, म्हणूनच मतदारसंघात अनेक कामे राज्यात उल्लेखनीय झाली.
सर्व क्षेत्रात खास बाब म्हणून ३८४५ कोटींचा निधी आणला. त्यातून दर्जेदार विकास कामे झाली. आ.रोहित पवार यांच्या विकास कामांवर टीका करण्याचा अधिकार कुठेलही उल्लेखनीय काम न करणार्या तथाकथित नेत्यांना अजिबात नाही, असा टोला माजी सभापती सुधीर राळेभात यांनी लगावला.
येणार्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक व बाहेरचा असा मुद्दाचा नसून झालेली विकास कामे व भविष्यतली विकासाची दृष्टी व ते पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आ. पवार यांच्याकडेच असल्याचे जनतेला माहीत असल्याने आ. पवार हे एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील ,असे प्रतिपादन माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केले.
या वेळी पत्रकार परिषदेला उद्योजक रमेश आजबे, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, युवकचे ता. अध्यक्ष प्रशांत राळेभात, शरद शिंदे, नरेंद्र जाधव, ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले,
हनुमंत पाटील, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, वसिम सय्यद, सोशल मीडिया अध्यक्ष काकासाहेब कोल्हे, बबलू शेख, नितीन ससाणे, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे आदी उपस्थित होते.





