निर्णयात दिरंगाई हा निष्काळजीपणाचा गुन्हा : मोदींची युपीए सरकारवर टीका

नवी दिल्ली- “युपीए’सरकारमधील नेते भ्रष्टाचारामध्ये अडकलेले होते आणि देशहितापेक्षा स्वार्थाला अधिक महत्व देणारे होते. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “युपीए’ सरकारच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. पूर्वीच्या सरकारमध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची क्षमता देशामध्ये असूनही त्या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी आवश्‍यक असणारी इच्छाशक्तीच नव्हती, असा आरोपही पंतप्रधानांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सध्या विरोधक असलेल्यांना जनतेने संधी दिली होती. पण संपूर्ण विरोधी पक्ष आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या सर्व महत्वाच्या मुद्दयांवरही विरोधकांनी शंका उपस्थित केली. बालाकोट इथल्या एअर स्ट्राईकवरही शंका उपस्थित करून विरोधकांनी लष्करावरही संशय घेतला आहे, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.
देशहितासाठी तणाव सहन करण्यास आणि तात्काळ निर्णय घेण्याची इच्छाशक्ती आपले सरकारमध्ये आहे. देशहिताचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करणे हा गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे, असे ते म्हणाले.

पूर्वीच्या सरकारने भ्रष्ट आचरणामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण केले होते. भ्रष्टाचारमुक्‍त व्यवस्था निर्माण करणे ही त्यांची जबाबदारी होती. मात्र स्वार्थाला देशहितापेक्षा अधिक महत्व दिल्याने तसे केले गेले नाही. मात्र आता जनतेच्या मनात गोंधळ होऊ द्यायचा नाही, असे आपल्या सरकारने ठरवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

काळ्या पैशाच्या तपासासाठी आपल्या सरकारच्या पहिल्याच बैठकीत विशेष तपास पथक नियुक्‍त करण्याचा निर्णय झाला.
अन्य देशांबरोबर झालेल्या कमकुवत करारांवर आता सरकार काम करत आहे. स्वीत्झर्लंड, मॉरिशस आदी देशांबरोबरच्या करारांची फेरआखणी करून काळ्या पैशाबाबतची माहिती मागवली जात आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.