#CWC2019 : भारतीय संघाच्या पराभवाची चौकशी होणार

लंडन – विश्‍वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीतच न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यवस्थापन समितीकडून (सीओए) त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या समितीपुढे बोलाविले जाणार आहे. तसेच संघनिवड प्रक्रियेबाबतही आढावा घेतला जाणार आहे.

समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी ही माहिती दिली. या समितीमध्ये राय यांच्याबरोबरच भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रवी थोडगे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांच्याबरोबरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

राय यांनी सांगितले की, कोहली याच्यासह भारतीय संघातील बरेचसे खेळाडू व शास्त्री हे रविवारी येथून विमानाने मायदेशी जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात कोहली व शास्त्री यांना बोलाविले जाईल. अंबाती रायुडू याने निवड प्रक्रियेवरच नाराजी व्यक्‍त करीत खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

न्यूझीलंडविरूद्ध 3 बाद 5 अशी स्थिती असताना अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याला पाठविण्याची आवश्‍यकता असताना त्याला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय कोणी घेतला, तसेच एकाच वेळी तीन यष्टीरक्षक खेळविण्याचा निर्णय का व कोणी घेतला याबाबत फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून तपशील घेतला जाणार आहे.

भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून डच्चू दिला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये केदार जाधव, दिनेश कार्तिक यांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. तसेच महेंद्रसिंग धोनी यांनी या विश्‍वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. त्याबाबतही विचारविनिमय केला जाण्याची शक्‍यता आहे. सध्या निवड करण्याचे सर्वाधिकार प्रसाद यांना देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.