मुंबई – शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांचा गुंतवणुकीच्या ससल्ल्याबाबत बनावट व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. हा व्हिडिओ चूकीचा आहे आणि गुंतवणूकदारांनी यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत मुंबई शेअर बाजाराने व्यक्त केले आहे. या व्हिडिओमध्ये राममूर्ती गुंतवणूक आणि इतर बाबीसंदर्भात सल्ला देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शेअर बाजाराच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना अशा प्रकारच्या टिप्स किंवा सल्ले देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनावट आहे आणि अशा प्रकारच्या व्हिडिओवर गुंतवणूकदारांनी किंवा नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओत राममूर्ती यांनी 2026 मध्ये कोणत्या शेअरची खरेदी करावी, त्यामुळे जास्त परतावा मिळेल या संदर्भात वक्तव्य केले असल्याचे भासविण्यात आले आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमावरून डिलीट करण्यासाठी आणि ज्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबई शेअर बाजार आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. शेअर बाजारातील कुठल्याही अधिकार्यांना अशा प्रकारच्या गुंतवणूक टिप्स देता येत नसतात. त्यामुळे आगामी काळातही अशा प्रकारचे व्हिडिओ समाज माध्यमावर आल्यानंतर त्यावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर आणि समाज माध्यमावर आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमावर पसरविले जाऊ नये, त्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येत असल्याचेही शेअर बाजाराने नमूद केले आहे.