नवी दिल्ली – भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता घसरत आहे, हा चिंतेचा विषय आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असते. त्यामुळे भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सुधारण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. जर्मनीतील मुनीच येथे बीएमडब्ल्यू कंपनीला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केल्यानंतर गांधी यांनी सांगितले की, बीएमडब्ल्यूच्या सहकार्याने टीव्हीएस कंपनी 450 सीसी मोटरसायकल तयार करीत आहे. या कामकाजाची आपण पाहणी केली. भारतातील टिव्हीएससारख्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्या उत्तम काम करीत असल्याबद्दल समाधान वाटले, असे गांधी यांनी सांगितले. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वाढण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गांधी जर्मनी येथील वास्तव्यात बर्याच उद्योजकाशी आणि राजकीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.