सातारा -स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता. खंडाळा) गावातील भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आणखी एक क्रांतीकारक पाऊल टाकले आहे. करोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करुन दि. 15 जून रोजी शाळा सुरु करण्याचा निर्धार या संस्थेने जाहीर केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. राज्यात सर्वत्रच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यावर्षी दि. 15 जून रोजी शाळा सुरु जिल्हा बॅंक राज्यातच नव्हे तर देशात आदर्श आहे. होतील की नाही यात शंका आहे. सद्यपरिस्थितीत शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार असला तरी पुढील धोका ओळखून अन्य काही पर्यायांवरही विचार सुरु आहेत. करोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन शाळा सुरु करण्याचा विचारही पुढे येत आहे. नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार कोकरे, संस्थेचे सचिव कृष्णाजी झगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला साजेसे काम करत शिक्षण संस्था दि. 15 जून रोजी सुरु करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून संस्थाचालक, पालक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, शिक्षणतज्ज्ञ यांच्यासमवेत विचारविनिमय, आढावा बैठक व सुसंवाद साधला जात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक हेमंतकुमार खाडे यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी आडे यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा झाली. या सभेत करोनाच्या संकटाला न घाबरता शाळा सुरु करावी, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक दिवस मुलींसाठी व एक दिवस मुलांसाठी अशी दिवसाआड दि. 15 जूनपासून शाळा भरवण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पट 415 असून 11 शिक्षक आहेत. वर्ग खोल्या नऊ आहेत. ग्रामपंचायतीने शाळा परिसर, वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करुन देण्याची तयारी ठेवली आहे. जिल्हाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दि. 15 जूनपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. आमची मानसिकता शाळा सुरु करण्याची आहे. स्त्री शिक्षणासाठी आपलं उभ आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाईंच्या माहेरघरातील शाळा सुरु करण्यास प्रशासन परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. – नंदकुमार कोकरे (प्राचार्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव)