पुणे जिल्हा | पाणीपट्टीच्या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा

मंचर, (प्रतिनिधी) – जलसंपदा विभागाने वाढीव पाणीपट्टीच्या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घेतला जात नाही. तोपर्यंत वाढीव दराने शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरू नये. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.
निघोटवाडी ता. आंबेगाव येथे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी डी. के. कोकणे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा केली व आपल्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जाईल. जोपर्यंत वाढीव पाणीपट्टीच्या संदर्भात झालेला निर्णय मागे घेतला जात नाही.
तोपर्यंत वाढीव दराने पाणीपट्टी आकारली जाणार नाही. जूनी थकीत पाणीपट्टी वसूल केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला डी. के. कोकणे यांनी दिल्याचे प्रभाकर बांगर यांनी सांगितले. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले, वाढीव दराने पाणीपट्टी वसूल करून दिली जाणार नाही. जुन्याच दराने पाणीपट्टी वसूल केली तर आमचा त्याला विरोध नाही .परंतु शेतकऱ्यांची अवस्था अडचणीची असताना जलसंपदा विभाग अशा पद्धतीने वाढीव दराने पाणीपट्टी वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडला जाईल. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन केले जाईल.





