आमच्या पक्षात हायकमांडने घेतलेला निर्णय अंतिम असतो – नाना पटोले

मुंबई – राज्यसभा उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. आमच्या पक्षात हायकमांडने घेतलेला निर्णय अंतिम असतो. त्यामुळे उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी स्वागतच केलं आहे. असं स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.
पुढे ते म्हणाले की, इम्रान प्रतापगढी यांच्यासारख्या तरूण आणि उत्साही कार्यकर्त्याला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने 10 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये खदखद निर्माण झाली आहे. अनेकांनी या यादीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. इमान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आल्यानंतर अभिनेत्री नगमा हिने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेत्री नगमा यांनी म्हटले आहे की, माझीही तपश्चर्या इम्रान प्रतापगडी यांच्या पेक्षा कमी पडली. मला राज्यसभा देण्याचे आश्वासन खुद्द सोनिया गांधी यांनी सन 2003-04 मध्ये दिले होते पण आज 18 वर्ष झाली तरी आपल्याला संधी मिळाली नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. मी इम्रान यांच्यापेक्षा कमी पात्र आहे का असा सवालही नगमा यांनी उपस्थित केला आहे.





