मुंबई – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी होत आहे. एकूण दाखल झालेल्या 34 याचिकांचे सहा गट तयार केले असून सहा याचिकांची आज सुनावणी पार पडली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या चार आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shinde Group) दाखल झालेल्या दोन याचिकांचा समावेश आहे. आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून (Thackeray group) आक्रमकपणे युक्तिवाद करण्यात आला.
शिंदे गटाच्या वकिलांकडून तब्बल दीड तास युक्तीवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाचे वकिल म्हणाले, आता अचानक पुरावे सादर करण्याची जाग त्यांना आली आहे. मात्र, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. (Shivsena split)
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रथमदर्शी चौकशी करण्याचे संकेत दिलेत. पूर्णपणे पुरावे बघण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला लक्ष्मणरेखा आखून दिली आहे. त्यातच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला.
सत्तांतर काळात काय काय झाले, तेवढ्या कालावधीपुरतेच तुम्हाला पहायचे आहे. राजकीय पक्षाची संरचना काय आहे हे आता विचारात घ्यायची गरज नाही. शिंदे गटाची याचिका पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तुम्ही कोणता असा निर्णय घेवू नका की ज्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल, असेही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.