आळंदी – आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने रविवारी (दि. 25) सायंकाळी सव्वापाच वाजता उडी मारली होती. त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकांकडून इंद्रायणी नदीत सलग तीन दिवस शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव (ता. खेड) येथे आढळून आला. दरम्यान, महिलेने का उडी मारली हे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. अनुष्का सुहास केदार (वय 20, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे पोलीस महिलेचे नाव आहे. आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. रविवारी सायंकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा शोधकार्य करण्यात आले आहे. आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य केले. अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथे आढळून आला. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.