जालंधर (पंजाब) : पंजाबातील शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची २२ वर्षीय मुलगी मुनमुन चितवान (Munmun Chitwan) हिचा वाढदिवसाच्या दिवशीच (१ जानेवारी) घरातील बाथरूममध्ये गीजरमधून गॅस लीक होऊन श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मिठा बाजार परिसरात घडली असून, नववर्ष आणि वाढदिवसाच्या आनंदी तयारीतून एका क्षणात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. नेमकं काय घडलं? मुनमुन अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. शॉवरसाठी गीजर सुरू केल्यानंतर त्यातील तांत्रिक बिघाडामुळे गॅस लीक झाला. बाथरूममध्ये विषारी वायू साचल्याने तिचा श्वास गुदमरला आणि ती बेशुद्ध पडली. बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला आणि तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनमुनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर किशनपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिस गीजरमधील तांत्रिक बिघाड, अपुरा व्हेंटिलेशन किंवा इतर कारणांचा अधिक तपास करत आहेत. कुटुंबीयांचा आक्रोश दीपक कंबोज यांनी सांगितले की, “आम्ही वाढदिवस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित केले होते. परंतु आनंदाचे वातावरण अचानक शोकात बदलले. मुनमुन अतिशय मनमिळाऊ आणि मिलनसार स्वभावाची मुलगी होती. तिच्या हसण्यामुळे घर नेहमी आनंदमय राहत असे.” परिसरातील लोक आणि शिवसेना कार्यकर्ते या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. ही दुर्घटना घरगुती गॅस गीजरच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.