ऍक्टिव्ह रुग्ण संख्याही 8 हजारांपेक्षा जास्त
पुणे – गेल्या तीनच दिवसांत बाधितांची संख्या एक हजारवरून गुरुवारी दीड हजारवर गेल्याने पुणेकरांना आता कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
9 मार्च रोजी 1 हजार 086 बाधित आढळले होते. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी बाधितांची संख्या 1 हजार 352 होती. मात्र, गुरुवारी ती थेट 1504 नोंदवण्यात आली.
सलग दुसऱ्या दिवशीही बाधितांमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील सहाजण पुण्याबाहेरील आहेत. एकूण मृतांची संख्या आता 4,917 झाली आहे. आजपर्यंत 2 लाख 13 हजार 25 जण बाधित असून,
त्यातील 1 लाख 99 हजार 567 रुण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 675 जणांना डिस्चार्ज दिला आहे. शहरात आजपर्यंत 1 कोटी 22 लाख 900 संशयितांची स्वॅब टेस्ट केली असून, गुरुवारीही 8 हजार 553 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.
ऍक्टिव्ह, गंभीर रुग्ण वाढले
बाधितांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही साडेआठ हजारांपेक्षा जास्त असून ती 8 हजार 541 झाली आहे. त्यामध्येही 357 बाधितांची स्थिती गंभीर असून, 739 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
राज्यात 14 हजार बाधित
राज्यातील करोना बाधितांची संख्याही वेगाने वाढत असून, गुरूवारी 14,317 बाधितांची नोंद करण्यात आली. तर 57 बाधितांचा मृत्यू झाला. आजपर्यंत राज्यात 1 कोटी 72 लाख 13 हजार 312 संशयितांची टेस्ट करण्यात आली; त्यापैकी 22 लाख 66 हजार 374 जण बाधित आढळले असून, ती टक्केवारी 13.17 टक्के आहे. एकूण बाधितांमधील आजपर्यंत 21 लाख 6 हजार 400 बाधित बरे झाले आहेत. 4 लाख 80 हजार 83 गृह विलगीकरणात असून, 4 हजार 719 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.