धोका वाढतोय! मुंबईमध्ये करोनाच्या डेल्टा प्लसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद; राज्यातील दुसरा बळी

मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने हळूहळू शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच मुंबईमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरमधील एका वृद्ध महिलेचा करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका वयोवृद्ध महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता. मुंबईमधील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने करोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली.
कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालाय.“६३ वर्षीय महिला रुग्णाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. आम्ही या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे कॉनटॅक्ट ट्रेसिंग केले आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत,” अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
डेल्टा व्हेरिएंटमुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असल्याचेही गोमारे यांनी म्हटले आहे. या महिलेला श्वसनासंदर्भात त्रास असल्याने तिला घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तिची करोना चाचणी २१ जुलै रोजी पॉझिटीव्ह आली. २४ जुलै रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले जिथे तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.





