सध्याचा कॉंग्रेस पक्ष मूळचा नसून इटालियन आहे – भाजप

नवी दिल्ली – देशासाठी तुमचे बलिदान काय, असा सवाल करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपने प्रत्युत्तर दिले. सध्याचा कॉंग्रेस पक्ष मूळचा नसून इटालियन कॉंग्रेस आहे, असा पलटवार भाजपने केला.
खर्गे यांनी सोमवारी राजस्थानमधील सभेत बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसने योगदान दिले. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्याउलट, भाजपने देशासाठी कुठलेही बलिदान दिले नाही, असे त्यांनी म्हटले. त्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी भाजपचे काही केंद्रीय मंत्री पुढे सरसावले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सध्याच्या कॉंग्रेसला इटालियन म्हटले.
बोगस नेत्यांनी भरलेला बोगस कॉंग्रेस पक्ष. त्या पक्षाचे अध्यक्ष रबरी शिक्का आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. खर्गे आक्षेपार्ह भाषेचा वापर करत आहेत. तशा बोलण्याने राजकारणी जनतेसाठी चेष्टेचा विषय बनत आहेत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटले. क्षुद्र वक्तव्यांमुळे कॉंग्रेस बुडेल, असा इशारा आणखी एक केंद्रीय मंत्री अश्वनीकुमार चौबे यांनी दिला.





