रहिमतपूर, – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक कधी नव्हे एवढे चुरशीची झाली. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच प्रत्येक गावात निवडणूक लढली गेली. यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाचा, याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत असून विजयाचा कौल मिळणार कोणाला याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील निवडणुकीच्या प्रचारालाही लागले त्यावेळी महायुतीकडून उमेदवारी मिळणार कोणाला, याची उत्सुकता मतदारसंघात होती. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. अपेक्षेप्रमाणे याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला होता. परंतु, या निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तर निवडणुकीचा निकाल काहीही लागू शकतो याची चर्चा आधीपासूनच होती . तसेच झाले. अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवण्यात मनोज घोरपडे यशस्वी झाले. दहा वर्षापासून मतदारसंघात भाजप रुजवण्यासाठी मनोज घोरपडे यांनी मेहनत घेतली होती. त्याचेच फळ म्हणून या निवडणुकीत त्यांना भाजपकडून संधी मिळाली. एक महिन्यापासून मतदारसंघात आरोप- प्रत्यारोपाचा धुरळा उठला होता. मनोज घोरपडे यांच्या साथीला खासदार उदयनराजे भोसले, आमदरा शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील यांच्यासह आमदारांविरोधात टीकेचा सूर धरत अनेकांनी प्रचाराला गती दिली. तर बाळासाहेब पाटील यांनी यशवंत विचारांची पाठराखण करत कोणावरही जाहीर टीकाटिपणी न करता गेल्या 25 वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर मते मागितली. पंचवीस वर्षापासून मतदारसंघातील विकासकामांचा चढता आलेख अजून राखण्यासाठी महाविकास आघाडीला मते द्या, असे ते सांगत होते. त्यांच्या जोडीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे ,जितेंद्र पवार यांच्यासहित शरद पवार यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या सहाव्या विजयासाठी निकराचे प्रयत्न केले आहेत. मतदान झाले, मतयंत्रे बंद झाली. परंतु, कार्यकर्त्यांची उत्सुकता मात्र शिगेला लागली आहे. विजयाचे दावे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून केले जात असले तरीही मतदारांचा कौल कोणाला मिळाला याची चौकशी मात्र सतत सुरू आहे. मित्र, नातलगांना विचारून भागात झालेल्या मतदानाची माहिती दिली जात आहे. तर तुमच्या भागात जोर कोणाचा याचीही चौकशी केली जात आहे. उद्या दुपारपर्यंत विजयाचा कल हाती येणार आहे. परंतु, तोपर्यंत सर्वांची उत्सुकता ताणली आहे.