पुणे -“आर्थिक आणि सामाजिक विकासाचे चक्र पाण्यावर अवलंबून आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी घरगुती आणि शेतीसाठी पाणी बचत करणे आवश्यक आहे. जलसुरक्षा आराखडा, जल अंदाजपत्रक, भूजल पातळी, पर्जन्यमान, पाणी गुणवत्ता याबाबत साक्षरता निर्माण झाली, तरच लोकांना पाण्याचे महत्व कळेल आणि पाणी बचतीची सवय लागेल,’ असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त तथा प्रकल्प संचालक चिंतामणी जोशी यांनी स्पष्ट केले. अटल भूजल पंधरवड्याच्या राज्यस्तरीय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहसंचालक डॉ. विजय पाखमोडे, प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मग्गीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाचे डॉ. प्रमोद रेड्डी, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे आदी उपस्थित होते. भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक यांच्या विद्यमाने भूजल व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना 13 जिल्ह्यांतील 1 हजार 442 गावांमध्ये सुरू आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान छतावरील पाऊस पाणी संकलन लाइव्ह मॉडेल, रिचार्ज शॉफ्ट व पर्जन्यमापक या मॉडेलची माहिती देणे, ग्रामपंचायत स्तरावर मुले व महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन, फिल्म शोचे आयोजन करून अटल भूजल योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती करण्यात येणार आहेत. नागरिकांना आवाहन घरगुती आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा उपयोग काटकसरीने व नियोजनबद्ध करावा. ग्राम स्तरावर जागृती करावी. भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर गावांमध्ये पाणीबचत आणि वापरावर जागृती करावी भूजल पंधरवड्यात राबवले जाणारे उपक्रम ग्रामस्तरावर शेतकरी मेळावे, सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्याचे ऑनलाइन अर्ज, देशी फळे व भाजीपाला बियाण्यांचे प्रदर्शन आणि महिला बचतगट-अंगणवाडी सेविकांना परस बागेसाठी वितरण, देशी वाणाच्या रोपांची लागवड, शाळांमध्ये जलदिंडी, घरगुती व शेतीसाठी पाणी बचत तसेच भूजल पुनर्भरण व जलसंधारणासाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार.