श्रीगोंदा, (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील जाधव वस्तीवर पडलेल्या दरोड्यात दोन महिलांना मारहाण होऊन त्या गंभीर जखमी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत दोन आरोपींना अवघ्या २४ तासाच्या ताब्यात घेतल्याची माहिती समजते. दोन्ही आरोपी पकडण्यासाठी सेवानिवृत्त फौजदार यांनी मोलाची कामगिरी बजावली. घारगाव येथे तीन ते चार दरोडेखोरांनी घराच्या पडवीत झोपलेल्या विमल बापूराव जाधव (वय 68), सविता राजू जाधव (वय 42) या सासू-सूनेवर लाकडी दांडके तसेच लोखंडी धारदार वस्तूने हल्ला करत गंभीर जखमी करत ४५ हजारांचा सोन्याचा मुद्देमाल चोरुन नेला. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता बेलवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घरफोडी झाल्याचे सांगत दरोड्याची कलमे न लावता घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला. याबाबत दैनिक प्रभातमध्ये ‘घारगाव येथे दरोड्यात दोन महिला गंभीर जखमी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द होताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक मुद्द्यांच्या तसेच स्थानिक माहितीवरून तपास करत गुन्हा करून आरोपी पळून जात असताना कोपरगावपर्यंत आरोपीचा पाठलाग करत अवघ्या २४ तासाच्या आत दोन आरोपी ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी श्रीगोंदा येथील सेवानिवृत्त फौजदार यांनी मोलाची कामगिरी बजावली. मात्र, याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी भेट देण्यापासून ते आरोपी पकडण्यापर्यंत माहिती मिळून देखील गांभीर्याने दखल घेतली नसल्याची चर्चा होत आहे.