पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेला अखेर न्यायालयाने सुनावली शिक्षा

लंडन: सहसा महिलांवरील अत्याचारांच्याच बातम्या प्रसिद्ध होत असतात. आता महिलांनीही पुरुष साथीदारांवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पुरुष जोडीदारावर अत्याचार केल्यानं ब्रिटनच्या वेल्समधील एका महिलेला न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.
41 वर्षीय गॅरेथ जोन्स यांची ही कहाणी असून त्यांच्यासोबत सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनंच त्यांच्यावर हे अत्याचार केले आहेत. जुलै 2021 मध्ये जोन्स यांची सारा रिग्बी या महिलेसोबत ऑनलाइन मैत्री झाली. मात्र नंतर तिच्या अत्याचारांना कंटाळून त्यांनी अखेर त्यासंबंधी मदत करणाऱ्या ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली.
‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’च्या माहितीनुसार, पुरुषांवरील अत्याचार ही काही आता दुर्मिळ बाब राहिलेली नाही. सहा किंवा सात पुरुषांपैकी एक तरी पुरुष त्याच्या आयुष्यात अशा प्रकारे महिलेच्या अत्याचाराला बळी पडतो. या प्रकरणात 41 वर्षीय सारा रिग्बी या महिलेला या अत्याचार प्रकरणी 20 महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात अली आहे. तिनं आपला पुरुष जोडीदार गॅरेथ जोन्सवर केलेला अत्याचार न्यायालयात सिद्ध झाला होता.
व्यवस्थापकाची नोकरी करणारे गॅरेथ जोन्स यांच्या सांगण्यानुसार, रिग्बी आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या नातेसंबंधांच्या दरम्यान त्यांना मित्र आणि कुटुंबापासून दूर राहावं लागलं. तसंच या काळात त्यांचं सुमारे 40 हजार डॉलरचं आर्थिक नुकसानही झालं .त्यांना या काळात दररोज शिवीगाळ आणि अपमान सहन करावा लागला.
रिग्बीच्या परवानगीशिवाय घरातील टॉयलेट, बाथरूमही वापरायला त्यांना परवानगी नव्हती. त्यांच्या खाण्यापिण्यावरही तिनं बंधनं घातली होती. त्यामुळं दोन महिन्यांत जोन्स यांचं वजन 28 किलोनं कमी झालं. शिवाय ‘या अत्याचाराबद्दल कोणाशीही बोललास, तर तू माझ्यावर हल्ला केलास,’ असं पोलिसांना सांगेन, अशी धमकीही रिग्बीनं जोन्स यांना दिली होती.
हे सगळं प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अखेर जोन्स यांनी गुपचूप त्यांच्या आईची भेट घेतली आणि तिला सर्व प्रकार सांगितला. त्याच सुमारास गॅरेथ यांनी ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ल मदतीसाठी संपर्क केला. गॅरेथ घरगुती हिंसाचार सहन करत आहेत, यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे हे त्या संस्थेच्याही लक्षात आलं. गॅरेथला भविष्यात नवा प्रेमळ समंजस जोडीदार मिळेल, अशी आशा त्यांच्या आईला वाटते आहे. गॅरेथ मात्र अजून नव्या नातेसंबंधांसाठी मानसिक दृष्ट्या तयार झालेले नाही.





