नवी दिल्ली – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथून बाहेर पडण्यासाठी लोक जीव धोक्यात घातल आहेत. अनेक जणांनी विमानाला लटकून अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. काबुल विमानतळाला तर एसटी बसस्टॉपचं स्वरुप प्राप्त झालं. या स्थितीत भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सामील असलेल्या विदर्भ कन्येच्या धाडसासं सर्वत्र कौतुक होत आहे.
भारताकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी विमान पाठविण्यात आले होते. त्याच विमानातून विदर्भातील अमरावतीमधील दर्यापूरच्या लेकीने 129 भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणलं.
अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर जीवाच्या भीतीने तेथील लोक मिळेल त्या विमानाने देश सोडण्याच्या तयारीत आहेत. काही जण टेकऑफ करण्यापूर्वी विमानाला लटकले होते. त्यातील काही खाली कोसळून मृत्यूमुखी पडले. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशा परिस्थितीत विदर्भकन्या दर्यापूर येथील श्वेता चंद्रकांत शंके आपल्या सहकाऱ्यांसोबत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये गेली होती. विशेष म्हणजे राजधानी काबूलवर देखील तालिबानने ताबा मिळवला आहे.
इंडियन एअरलाईन्सने पाठवलेल्या विमानात श्वेता हवाईसुंदरी म्हणून गेली होती. काबूलमध्ये अतिशय बिकट परिस्थिती असूनही तेथील १२९ भारतीयांना घेऊन विमान भारतात परतलं आहे.
दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथील श्वेताचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तर तिची बहिण दंतरोगतज्ज्ञ आहे. 2017-18 मध्ये ती इंडियन एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून रुजू झाली आहे. ती सध्या दिल्लीत कार्यरत आहे.