Menopause Clinic: महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ (Menopause Clinic) सुरू करण्यात आले असून, या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे अशा प्रकारचे पाऊल उचलणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, राज्यभरातील महिलांकडून याचे स्वागत होत आहे. महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा – मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक परंतु अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. या काळात होणारे शारीरिक बदल, हॉर्मोनल असंतुलन, मानसिक ताण, हाडांचे आजार, निद्रानाश आणि नैराश्य यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हीच सामाजिक आणि वैद्यकीय गरज ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विशेष क्लिनिकची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. एकाच छताखाली सर्व सुविधा – या मेनोपॉज क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला: रजोनिवृत्तीशी संबंधित समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन. तपासणी: हाडे, हृदय आणि हॉर्मोनल बदलांशी संबंधित चाचण्या. मानसिक आरोग्य: बदलत्या शारीरिक स्थितीमुळे येणाऱ्या तणावासाठी विशेष समुपदेशन. औषधोपचार: आवश्यक औषधे आणि भविष्यातील आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय. मकरसंक्रांतीची आरोग्यदायी भेट – मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. “महिलांचे आरोग्य हीच कुटुंबाची शक्ती आहे,” असे मानून ही ‘आरोग्याची गोड भेट’ दिल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने घेतलेला हा निर्णय आता देशातील इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे. “मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. महिलांचे आरोग्य मजबूत झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य नक्कीच सक्षम होईल.” — मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री