देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येतीय – पंतप्रधान

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे ढाळसात असल्याचा आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला पंतप्रधानांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी “देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो,” असा दावा मोदी यांनी केला आहे.

“भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचे आवडतं ठिकाण बनेल,” असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्धची सरकारची लढाई, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जोर दिला. “चीनचे नाव न घेता त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या महामारीनंतर जगभरात भारत उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवस्थेत अग्रगण्य देशांमध्ये सहभागी होईल. इतर देशांना झालेल्या नुकसानीचा फायदा घेणं यावर भारताचा विश्वास नाही. परंतु भारत आपल्या लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुरवठ्यातून हे स्थान मिळवेल,” असे मोदी म्हणाले.

सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेविषयी समाधान व्यक्त करताना पंतप्रधान यांनी, “अर्थव्यवस्थेचे सर्व निकष हेच दर्शवतात की, भारत रिकव्हरीच्या मार्गावर आहे. कृषी, परदेशी गुंतवणूक, उत्पादनात वेग, गाड्यांच्या विक्रीत वाढ ही उदारहणं पाहा. ईपीएफओमध्ये जास्तीत जास्त लोकांची गुंतवणूक हेच दर्शवते की, नोकऱ्यांमध्ये तेजी आली आहे.” “गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाढ ही विकासाची प्रेरणा असेल. आमची सुधारणावादी पावलं हे सुनिश्चित करतील की गुंतवणुकीसाठी भारत सर्वात महत्वाचे स्थान बनेल,” असेही नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अनेक तज्ज्ञांनी या दुरुस्तीची बराच काळ पाठराखण केली आहे. याचं श्रेय आम्हाला मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा आहे.” नव्या मदत पॅकेजसंदर्भात मोदी म्हणाले की, “अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी सर्व पावलं वेळोवेळी उचलली जातील याकडे आमचं लक्ष असेल.” कोरोनावरुन विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत मोदी म्हणाले की, “मार्च महिन्यात जी शंका उपस्थित केली होती, त्यानंतर तुम्ही सध्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहा.” “आपत्तीपीडित लोकांसाठी तातडीने मदतीची पावलं उचलण्यात आहे. तर याआधीच्या आपत्तींमध्ये भ्रष्टाचारामुळे गरिबांना वेळेवर दिलासा मिळत नसे,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

राज्यांच्या जीएसटी परताव्याबाबत मोदी म्हणाले की, “राज्य सरकारांप्रती आमचं सरकारत संवेदनशील नाही, हे म्हणणं चुकीचं असेल. यूपीए सरकारच्या काळात वॅट आला होता तेव्हा त्यांनी राज्यांना महसुलाच्या नुकसानभरपाईचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण झालं नाही. त्यांनी सलग पाच वर्षांपूर्वी राज्यांच्या नुकसानीची भरपाई केली नव्हती.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.