बिहार निवडणुकीपासून मोदी सरकारच्या ‘भ्रष्ट कारभाराची’ उलटी गिनती सुरू होईल; CWC बैठकीत खर्गेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पटना/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बुधवारी पटना येथे आयोजित काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर ( CWC meeting) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘वोट चोरी’, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, आरक्षण आणि बिहारशी संबंधित मुद्द्यांवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. बिहार निवडणुकीपासून मोदी सरकारच्या ‘भ्रष्ट कारभाराची’ उलटी गिनती सुरू होईल, असे खरगे म्हणाले.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह –
खरगे यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, लोकशाहीचा पाया निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुकीवर अवलंबून आहे. मात्र, आज निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि पारदर्शीपणा यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “विविध राज्यांमध्ये वोट चोरीचे खुलासे झाले आहेत. पण आयोग प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी आमच्याकडून शपथपत्र मागत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
बिहारच्या धर्तीवर देशभरात लाखो मतदारांची नावे कापण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “वोट चोरी म्हणजे दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अति-मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरीब यांच्या रेशन, पेन्शन, औषध, मुलांच्या शिष्यवृत्ती आणि परीक्षांची चोरी आहे,” असे खरगे म्हणाले. ‘वोटर अधिकार यात्रे’मुळे बिहारच्या जनतेत जागृती निर्माण झाली आणि ते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढे आले, असेही ते म्हणाले.
परराष्ट्र धोरणावर टीका –
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना खरगे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अडचणी या मोदी सरकारच्या अपयश आणि कूटनीतीतील अक्षमतेचा परिणाम आहे. पंतप्रधान ज्यांना ‘माझे मित्र’ म्हणून ढोल पिटतात, तेच मित्र आज भारताला अनेक संकटात टाकत आहेत.” स्वदेशीचा पुरस्कार करताना दुसरीकडे चीनसाठी लाल गालिचा अंथरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत चीनमधून आयात दुप्पट वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवर प्रश्न –
खरगे यांनी देशासमोरील आर्थिक मंदी, बेरोजगारी, सामाजिक ध्रुवीकरण आणि स्वायत्त संवैधानिक संस्थांचे कमकुवत होणे यासारख्या समस्यांवर भाष्य केले. “मोदींचे ‘दोन कोटी नोकऱ्या’ देण्याचे आश्वासन अपूर्ण राहिले. नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली,” असे ते म्हणाले. जीएसटीमधील सुधारणांसाठी काँग्रेसने सुरुवातीपासून केलेल्या मागणीला आता सरकारला मान्यता द्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पन्न वाढले नाही, मग खर्च कसा वाढेल?
“मोदीजी म्हणतात, लोकांनी अधिक खर्च करावा. पण गेल्या दहा वर्षांत उत्पन्न वाढले नाही, फक्त महागाई वाढली आहे. मग लोक अधिक खर्च कसे करतील?” असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला. ग्रामीण उपभोग गेल्या ५० वर्षांतील नीचांकी पातळीवर असून, आर्थिक विषमता शिगेला पोहोचली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष –
खरगे यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदींचे आश्वासन पूर्ण न झाल्याचे सांगितले. “२०२०-२१ मधील तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकरी आंदोलन झाले, ७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले,” असे ते म्हणाले. केंद्र आणि इतर राज्यांतील भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना भडकवण्याची संधी शोधत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरक्षणावरून मोदींना सवाल –
खरगे यांनी बिहारमधील ६५ टक्के आरक्षणाला संवैधानिक संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल पंतप्रधानांना केला. “काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरून जातिगणनेची मागणी पूर्ण करायला भाग पाडले. बिहारमध्येही महागठबंधन सरकारच्या काळात जातिगणना झाली. पण बिहारच्या जनतेला ६५ टक्के आरक्षणाला संवैधानिक संरक्षण का मिळाले नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तमिळनाडूत ३० वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने ६९ टक्के आरक्षणाला संवैधानिक संरक्षण दिल्याचे उदाहरण देत त्यांनी डबल इंजिन सरकारच्या अपयशावर बोट ठेवले.
बिहार निवडणुकीत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा –
पटना येथील या बैठकीत काँग्रेसने बिहारच्या निवडणुकीत आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले. खरगे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने स्थानिक मुद्द्यांना राष्ट्रीय पातळीवर जोडत भाजप सरकारवर सर्वंकष हल्ला चढवला आहे.




