Kunal Icon Road: कुणाल आयकॉन रस्त्याचा खर्च ४० कोटींपर्यंत पोहोचला
Kunal Icon Road: प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक या कुणाल आयकॉन रस्त्याच्या विकासकामांतर्गत पाणीपुरवठा विषयक कामांसाठी सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांचा वाढीव खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
त्यामुळे या कामाचा पाणीपुरवठा विषयक खर्च ३ कोटी ४७ लाख रुपयांवर जाणार आहे. या वाढीव खर्चासह संपूर्ण कामाच्या सुधारित खर्च ४० कोटींपर्यंत पोहोचला असून त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बीआरटीएस अनुषंगिक कामांसाठी प्रशासक ठराव क्रमांक ३८८, दिनांक २५ जुलै २०२३ नुसार ५५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामामध्ये प्रभाग क्रमांक २८ मधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक या कुणाल आयकॉन रस्त्याचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पात स्थापत्य कामांसह पाणीपुरवठा, जलनिःसारण आणि विद्युतविषयक कामांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत १८ मीटर रुंदीचा १ हजार ४८० मीटर आणि १२ मीटर रुंदीचा ३०० मीटर, असे एकूण १ हजार ७८० मीटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या मंजूर आराखड्यानुसार १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ३०० मिलिमीटर व्यासाची डीआय जलवाहिनी टाकण्याचे नियोजन होते.
नव्या जलवाहिन्यांची कामे आणि जुन्या वाहिनीच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा विषयक कामांच्या खर्चात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विषयक कामांसाठी १ कोटी ४७ लाख ४० हजार १५१ रुपयांचा वाढीव खर्च प्रस्तावित केला आहे. त्यामुळे या कामाचा सुधारित खर्च ३ कोटी ४७ लाख ४२ हजार ४२१ रुपये, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि भाववाढ, असा होणार आहे.
संपूर्ण एकत्रित प्रकल्पाचा सुधारित खर्च ३९ कोटी ६८ लाख १७ हजार ८१० रुपये (जीएसटी आणि भाववाढ वगळून) प्रस्तावित आहे. या सुधारित खर्चाला मान्यता देण्याबाबत आता सर्वसाधारण सभेत विचार होणार आहे.
म्हणून वाढीव खर्च…
या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुले आणि क्रीडाविषयक सुविधांचा विकास होत आहे. भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन जलवाहिन्यांच्या नियोजनात बदल करण्याची गरज आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या पुनर्रचनेसाठी नियुक्त केलेल्या मे. डी. आर. ए. कन्सल्टंट या सल्लागार संस्थेने परिसरात सध्याच्या ३०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांसोबत ४५० आणि ६०० मिलिमीटर व्यासाच्या डीआय जलवाहिन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकण्याची शिफारस केली आहे.
त्यानुसार रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ही कामे त्यापूर्वीच करणे आवश्यक असल्याचे नमूद करत हा वाढीव खर्च मंजूर करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
Pimpri-Chinchwad : शहरात हजारो फटाक्यांचे स्टॉल परवानगी मात्र मोजक्यांनाच





