पावणे तीन कोटींचा खर्च : स्थायीत प्रस्ताव सादर
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाच्या गंभीर रुग्ग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसवीर इंजेक्शनच्या 8 हजार 100 व्हाईल्स महापालिका खरेदी करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या या इंजेक्शनच्या वापरामुळे शहरातील करोना बाधितांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणण्यासाठी 2 कोटी 74 लाख 79 हजार 88 रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी (दि. 5) होणाऱ्या सभेत मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मृत्यू दरदेखील अधिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतत टिकेचा विषय ठरत आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभिर्याने घेत, करोनाला रोखण्यासाठी सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. करोनावर रेमडेसीवीर हे इंजेक्शन प्रभावी मानले जाते. याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र हे औषध अत्यंत महाग आहे.
हे औषध महाग असल्याने ते गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गरिबांनाही औषध उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीकोनातून या इंजेक्शच्या आठ हजार 100 व्हाईल्स खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या इंजेक्शनचे उत्पादन बंगळुरुमधील मेसर्स मायलन लॅबोरेटरीज कडून केले जात असून, शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार 3 हजार 392 रुपये 48 पैसे प्रति व्हाईल दराने या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.
थेट उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन खरेदी
रेमडेसीवीर इंजेक्शनला भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थाने (खउचठ) परवानगी दिली आहे. 30 जूननंतर रेमडेसीवीर इंजेक्शन प्रत्येकजिल्ह्यात उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र, आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका बंगळुरुतील थेट उत्पादन कंपनीकडून हे औषध विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.