डिसेंबर महिन्यात करोनाची लस शक्य

मुंबई – करोनावर लस तयार करण्याचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू आहे. या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतात या लसीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी दिली आहे.
सुरुवातीला कोणतीही लस मोठ्या प्रमाणात बनवली जाते. त्याप्रमाणे ही लसदेखील मोठ्या प्रमाणावर बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमध्ये भरणे सुरू करणार आहोत. या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीयांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असे राजीव ढेरे यांनी सांगितले.
ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरू असलेले प्रयोग, भारतीयांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते.
कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल.
आतापर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगाची प्रगती पाहता आपण करोना लसीच्या 90 ते 95 टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावाही राजीव ढेरे यांनी केला आहे.





