Pimpri : किवळेतील रस्त्यांची अवस्था दयनीय

रावेत : किवळे परिसरातील रस्त्यांचे रूपांतर आता खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या चिखलाच्या रस्त्यात झालं आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील ही दयनीय अवस्था पाहून ‘हा रस्ता आहे की अडथळ्यांची शर्यत?’ असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यावर खड्डे असल्याने त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांची प्रशासनाकडे मागणी होती.
मात्र या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यांवरील खड्डे अधिकच खोल गेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीस्वारांना तोल सावरता सावरता जीव मुठीत धरावा लागतो, तर शाळकरी मुलं व वयोवृद्धांना घराबाहेर पडणंही धोकादायक झालं आहे.
तात्पुरत्या डागडुजीचा फार्स!
पावसाळ्यापूर्वी आणि सध्याही नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या असूनही, उपाययोजना तात्पुरत्या डागडुजीपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. टाकलेली खडी व मुरुम पुढच्याच पावसात वाहून जात असून, परिस्थिती पुन्हा ढासळते, असा अनुभव रहिवाशांना वारंवार येतोय.
रहिवाशांचा संताप
स्थानिक बांधकाम व्यावसायिक अनिल साळुंके यांनी सांगितलं की, सोसायटीतील नागरिकांनी सारथी अॅपवर तक्रारी केल्या, तरीही केवळ नावापुरती कारवाई केली जाते. चिखल, पाणी व खड्ड्यांमुळे वाहनं घसरतात, अपघात होतात. नगरपालिकेने एकदाच सिमेंटचा अथवा दर्जेदार डांबरीकरण केलेला रस्ता करावा, हीच अपेक्षा आहे.
महापालिकेची भूमिका काय?
या तक्रारीवर उपअभियंता स्वप्नील शिर्के यांनी सांगितलं की, या ठिकाणी अद्याप रस्त्याच्या संपूर्ण जागेचा ताबा मिळालेला नाही. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनुसार तात्पुरती डागडुजी कनिष्ठ अभियंत्यांना करण्यास सांगण्यात आली आहे, जेणेकरून वाहन चालक व नागरिकांना कमी त्रास होईल.
कायमस्वरूपी उपाय कधी?
तात्पुरते उपाय नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही, तर प्रवासाच्या सुरक्षिततेचा आहे. किवळ्यातील वाढती वस्ती, वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक आणि पावसाळ्याचं आव्हान लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी आता ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचं ठरत आहे.
किवळे आणि आदर्शनगर येथील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिक बिकट होते अशी अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंबंधी लवकरच पालक मंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी साकडे घालणार आहे.
– बापू कातळे] संस्थापक अध्यक्ष] संकल्प सोशल फाउंडेशन
किवळेमधील साई औरा ते विठ्ठल हाइट्स रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. ज्यामुळे प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आणि गर्भवती महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणी येतात. सर्व रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित कारवाई करावी. जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.
– नचिकेत खटावकर, रहिवासी, विठ्ठल हाइट्स, किवळे





