20 नवीन रुग्णांची भर : शहराबाहेरील एकाचा मृत्यू पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील आणखी 20 जणांना “करोना’ची लागण झाल्याने एकूण “करोनाबाधितां’चा आकडा आठशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 329 रुग्णांपैकी 20 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत 788 जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 472 रुग्णांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज भारती विद्यापीठ येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. शहरातील आनंदनगर, दापोडी, भारतनगर, पिंपरी, मोरवाडी, दत्तनगर, थेरगाव, पाटीलनगर, चिखली, भाटनगर, वडमुखवाडी, भोसरी येथील 20 जणांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये 14 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 788 झाली आहे. आज 34 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 472 झाली आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण बौद्धनगर, दत्तनगर, आकुर्डी, सांगवी, किवळे, पिंपळे गुरव, रहाटणी, भोसरी, पिंपळे सौदागर, विजयनगर, दिघी, भाटनगर, चिखली येथील रहिवाशी आहेत. “करोना’ पॉझिटिव्ह आल्याने सध्या उपचार घेत असलेल्या 329 रुग्णांपैकी 172 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. तर 97 रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत. तसेच 20 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दळवीनगर, रेणुका अपार्टमेंट, काळेवाडी येथील विजयनगर, भोसरीतील बालाजीनगर, खराळवाडी साई श्रद्धा अपार्टमेंट, सोनकर कॉम्पलेक्स पिंपरी, कमलाकर चौक वाकड, रहाटणीतील शिवतीर्थ नगर, भोसरीतील वडमुखवाडी हा परिसर सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून सील करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात वृद्धेचा मृत्यू सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 8) करोनाने एका 76 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. दौंड-सिंधी गल्ली येथील ही वृद्धा आहे. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत मृत्यू होणाऱ्यांची संख्या 13 झाली आहे. दरम्यान, आज आणखी सहा करोना बाधित रुग्णांची भर पडली. यात 4 महिला आणि 2 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.