पुणे : महाराष्ट्र धर्म ही सामाजिक चळवळ होती. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग निश्चित करण्यासाठी त्याला धर्माचे अधिष्ठान देण्यात आले. मात्र, महाराष्ट्र धर्माला जातीय चौकटीत अडकविण्याला सर्वांचा विरोध होता. महाराष्ट्र धर्म ही संकल्पना खूप व्यापक अर्थाने आहे, अशी माहिती राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी लिट फेस्टमध्ये दिली. पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित पुणे साहित्य महोत्सवात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी डॉ. मोरे यांच्याशी संवाद साधला. “महाराष्ट्र धर्म वाढवावा…’ हा त्यांच्या चर्चेचा विषय होता. यावेळी एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे उपस्थित होते. मोरे म्हणाले, महाराष्ट्र धर्म व्यापक आहे. यात कोणालाही बाजूला सरकवले जात नाही. नामदेव महाराज पंजाबला गेले. त्यांनी तेथे भागवत धर्माचा विस्तार केला. त्यांनी पंजाबी लोकांना सामावून घेतले. त्यांच्या धर्म साहित्यात नामदेवांच्या ओव्यांचा समावेश झाला. सयाजीराव गायकवाड बडोद्याला गेले. त्यांनी तिथे भजन रुजवले. बडोद्यातून पंढरपूरपर्यंत वारी यायची. यातून महाराष्ट्र धर्माची व्याप्ती लक्षात येते. मिलिंद भणगे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. तुकोबा हे राष्ट्रीय कवी’ “संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा ब्रिटिशांनी प्रसिद्ध केली होती. ब्रिटिश अधिकारी ग्रँट याच्यावर तुकोबांचा प्रभाव होता. त्यावेळी महाराष्ट्र धर्म म्हणजे राष्ट्रधर्म आणि त्याचाच दुसरा अर्थ भागवत धर्म असा त्याकाळी घेतला जात होता. संतांमुळे हा धर्म टिकला, असा विचार त्यावेळच्या विचारवंत-अभ्यासकांनी मांडला होता,’ अशी माहिती डॉ. मोरे यांनी सांगितले. …म्हणून आरक्षणाची मागणी मराठा समाजाचा प्रश्न हा जातीचा नसून मातीचा आहे. शेती परवडत नाही त्यामुळे आरक्षणाच्या मागणीत वाढ होते आहे. तसेच, जात हा राजकारणासाठीचा शॉर्टकट आहे. त्यामुळे आपल्याकडच्या काही लोकांना जात टिकवायची आहे, अशी खंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.