‘वाई’साठी महाविकास आघाडीचा सर्वसमावेशक उमेदवार स्थानिक निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार

पिसाळ व अॅड. बागवान यांची माहिती
वाई – वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाची आगामी विधानसभा निवडणुक महाविकास आघाडीमधून लढविण्याची काँग्रेसने तयारी दर्शविली असून त्यासाठी सर्वसमावेशक उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा करत तशी मागणी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पिसाळ व खंडाळा तालुकाध्यक्ष अॅड. सरफाराज बागवान यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, कार्याध्यक्ष सुनील बाबर, काशिनाथ पिसाळ, विहार पावसकर, सचिन काटे, जहीर शारवाना, मनीष गाढवे,अतुल संकपाळ, सौ मंजिरी पानसे, प्रदीप जायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला अभुतपूर्व यश मिळाले आहे. मतदार संघातील कॉंग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यानी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे याचे जोमाने काम केले. त्यांना वाई विधानसभा मतदार संघात साडेसहा हजाराचे मताधिक्य मिळवण्यात कॉंग्रेस पक्षाचा सुद्धा महत्वाचा वाटा राहिला आहे. परिणामी कॉंग्रेसच्या कार्यकार्त्याचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे.
आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून गावागावात-वाडीवस्तीवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते निर्माण केले आहेत. नव्याजुन्यांची सांगड घालून आम्ही कॉंग्रेस पक्ष वाढवला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रेसाठी वाई विधानसभा मतदार संघातून शेकडो कार्यकर्ते सहभागी करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो. येणा-या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. वाई विधानसभा मतदार संघ हा कायमस्वरूपी कॉग्रेस विचारांच्या पाठिशी राहिलेला
मतदार संघ आहे. या मतदार संघाचे स्व. किसनवीर आबा, प्रतापराव भोसले, मदन आप्पा पिसाळ अशा दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या कार्यकाळात कोटयवधी रूपयांची विकासकामे मतदारसंघात झालेली आहेत. त्यामुळेच इथली सर्वसामान्य जनता आजपर्यत कॉंग्रेसच्या पाठीशी राहिली आहे.
कॉंग्रेस निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही तालुक्यांच्या कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने येणारी विधानसभा कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातुनच लढविली जावी अशी अपेक्षा सर्वानी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षाकडे सध्या सर्वाना सामावून घेणारा उमेदवार असून आम्ही त्या उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहोत. वाई विधानसभा मतदार संघाची निवडणूक कॉंग्रेस पक्षाने लढवावी तसेच येणा-या काळात कॉंग्रेस पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.





