प्रभात वृत्तसेवा पुणे – काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाच्या प्रकरणाचा पोलिसांनी केवळ २ तासांत उलगडा केला आहे. तक्रार करणाऱ्यानेच आपल्या मित्राचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डायल ११२ वर फोनपोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पाचला किसन राजमंगल सहा ( २०, रा. बिहार) याने डायल ११२ वर फोन केला. तो म्हणाला, त्याचा मित्र रविकुमार शिवशंकर यादव ( ३३) याच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला असून, डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केले आहे. काळेपडळआणि महमंदवाडी पोलीस घटनास्थळी पोहचले असता, साईगंगा सोसायटीसमोर पत्र्याच्या शेडमध्ये रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मित्रच संशयाच्या भोवऱ्यात.. फोन करणाऱ्या किसनच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तेथे चार अनोळखी इसमांची कोणतीही हालचाल आढळली नाही. शेजाऱ्यांकडून माहिती घेता मयत व तक्रारदारांमध्ये पूर्वीही किरकोळ वाद झाल्याचे समोर आले. विविध प्रश्नांच्या फैरीत अडकलेला किसन पोलिसी खाक्याला शरण आला. दारूच्या नशेत मित्राने आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती. पूर्वीही मारहाण झाल्याचा राग मनात होता. त्यामुळे मित्र झोपेत असताना लोखंडी पहाराने डोक्यात वार करून खून केल्याची त्याने कबुली दिली.याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहा. आयुक्त धन्यकुमार गोडसे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.