नगर- महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन वर्षांपासून बळजबरी मद्यपान करत असलेल्या महापालिकेच्या “त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांची आता स्वतंत्र समितीमार्फत चौकशी होणार आहे. बालकल्याण समितीनेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय, तसेच चाईल्ड लाईन या संस्थेतील काही वरिष्ठांना ही चौकशी करण्याचे अधिकार दिले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी तसेच अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह काही कर्मचारी घरात घुसून दारू पीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच कथित घटनेत त्या मुलाने आपणास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले आहे. याची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तातडीने त्या अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र, तक्रारदार मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी काल त्यास बाल कल्याण समितीसमोर हजर केले होते. या समितीने प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, या हेतूने पुन्हा एक समितीही गठित केली. त्यास वरील दोन्ही आस्थापनानांचे प्रमुख अधिकारी असतील, अशी रचना केली. दरम्यान, या समितीने पुढील दोन दिवसांत अहवाल द्यावा, अशी सूचना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल.