- जागतिक अंध दिन : डोळ्यावर पट्टी बांधून काही अंतर चालले कृष्णप्रकाश
पिंपरी – नशिबी कायमच अंध:कार असलेल्या अंध बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून काही अंतर चालून पाहिले. जागतिक अंध दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाइंड व ‘जीतो ‘ पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने “चलो किसीका सहारा बने’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ, जीतो अध्यक्ष संतोष धोका यांच्यासह संस्थेचे सहकारी व अंध विद्यार्थी उपस्थित होते. अंध विद्यार्थ्यांना आयुक्तांच्या हस्ते पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवे. मोठी स्वप्नं पाहून यशस्वी व्हायला हवे. दृष्टी नसली तरीही आपल्याकडे मोठे ध्येय गाठण्याची शक्ती आहे. अडचणींवर मात करून आपण शिक्षण, खेळ, नोकरीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहात ही आनंदाची बाब आहे. अंध बांधवांच्या व्यथा, वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नको सहकार्य करणे महत्वाचे आहे. अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार करता येतात,” असा संदेश त्यांनी दिला.
आधुनिक युगात तंत्र ज्ञानाचा वापर करुन अंध व्यक्ती करत असलेली कार्यांबाबत ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अंध शिक्षक व प्रशिक्षक सतीश नवले यांनी ऑनलाइनद्वारे अंध व्यक्तींच्या शिक्षण, रोजगार व इतर कार्यक्रमाची माहिती दिली. समाजच्या मुख्य प्रवाहात अंध बांधवांना सामावून घेण्यासाठी समाजातील डोळस व्यक्तींनी पुढे यायला हवे अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमासाठी अंध विद्यार्थी संतोष राऊत, तृप्ती कर्णावट, पूनम बंब, सुस्मिता कन्हेरी, नेमीचंद ठोले, विश्वास काशीद,अर्चना चोरडिया, सचिन साकोरे, उमेश भंडारी, मनीष ओस्तवाल यांच्या सह संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.