पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या भरवशाच्या ठिकाणी झालेला सपाटून पराभव हा भाजपला खरेच चिंतन आणि विचार करण्याला भाग पाडणारा आहे. कोठे चुकले? याचे चिंतन पक्ष श्रेष्ठींनी केले आहेच, म्हणूनच भाजपतील “चाणक्य’ म्हटले जाणारे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कमान हाती घेतली आहे. या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी शहा हे भाजपच्या अधिवेशनाला आले आणि त्यांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत ४८ जागांपैकी ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाने मुसंडी मारली. त्यामुळे भाजपला आता हे डॅमेज कंट्रोल करणे क्रमप्राप्त बनले आणि विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहा यांनीच ही कमान हातात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर बांधलेल्या संधानामुळेच हे झाले अशीही टीका झाली. परंतु “ही राजकीय तडजोड करावी लागली आणि राजकारणात असे करावे लागते,’ असे फडणवीस यांनी भाषणात कबूल केले. फडणवीस यांचेच नेतृत्त्व किती योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्नही अन्य नेत्यांनी अधिवेशनात केला. दरम्यान, लोकसभेला कोणी काम केले आणि कोणी नाही, याचा कच्चा चिठ्ठा पक्षाने गोळा केला आहे. या रिपोर्ट कार्डच्या पार्श्वभूमीवर विधानसभेची गणिते ठरवली जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे कोणाची ताकद किती यापेक्षा आपले रिपोर्ट कार्ड काय पोहोचले आहे, याचा विचार इच्छुकांना करावा लागणार आहे. कार्यकर्त्यांना “बूस्टर’ देण्याचा प्रयत्न पुण्यात अधिवेशनासाठी शहा हे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्रीच आले. त्यांनी रविवारी सकाळपासून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या. यामधून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास थोडा डळमळीत झाल्याचे जाणवल्याचे ते भाषणात म्हणाले. परंतु खचून न जाता लढून दाखवा आणि जिंकून दाखवा असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना “बूस्टर’ देण्याचा प्रयत्न केला. वक्तव्य सुखावणारे, पण… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांवेळी पवारांना “भटकणारा आत्मा’ म्हटले, परंतु त्याचे परिणाम उलटेच झाले. आता शहा यांनीही आपल्या भाषणात पवार यांच्यावरच हल्लाबोल करत त्यांना “भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार’ म्हटले. त्यामुळे भाजपेयींना हे वक्तव्य सुखावणारे असले तरी त्याचा परिणाम काय होईल हे आता येणारा काळच ठरवेल.