पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशाने वाढ झाली. त्यामुळे मागील आठवडाभर हुडहुडी भरणारी थंडीचा जोर कमी झाला आहे. तर रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि १५ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान दहा अंशांखाली आले. त्यामुळे मागील आठवडाभर शहरातील एनडीए, हवेली, शिवाजीनगर, पाषाण, बारामती, राजगुरूनगर यांसह काही भागांत थंडीची लाट अनुवयला मिळाली. एनडीए आणि हवेली तालुक्यात नीचांकी ८.२ अंशांपर्यंत पारा खाली आला होता. मात्र, गेल्या २४ तासांत थंडीचा जोर कमी झाला. आज पहाटे ८ अंशापर्यंत खाली आलेला पारा दोन ते तीन अंशाने वाढले आणि रविवारी पहाटे एनडीए आणि माळीण येथे सर्वात कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवेली तालुक्यात १२.५, पाषाण आणि शिवाजीनगर येथे १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातही एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. दरम्यान, दि. ३ डिसेंबरनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.