खासदार बारणे यांच्या प्रशासनाला सूचना
पिंपरी – शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने आणखी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची “करोना टेस्ट’ करावी. सर्वेक्षण करत असताना ज्यांना मधुमेह, विविध आजार आहेत. अशांची एक यादी तयार करून त्यांचीही चाचणी करावी. जेणेकरून करोनाची लागण झाली असेल तर तात्काळ उपचार करता येतील, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून खासगी डॉक्टरांनाही “ओपीडी’ सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत तब्बल 54 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील करोना वॉर रुमला भेट देऊन माहिती घेतली. काही त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करण्याचे निर्देश बारणे यांनी प्रशासनाला दिले. महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते नामदेव ढाके, वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे या वेळी उपस्थित होते.