पुणे -विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर, काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभरात शहरात 3.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत विदर्भात जोरदार, तर कोकण-गोवा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. 12 जुलैपर्यंत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामध्ये घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/सायंकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढणार असून, शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.