राहाता – गेली अनेक वर्षापासून भावजयसोबत एकत्रित राहणाऱ्या दिराने दारूच्या नशेत टणक वस्तूने मारहाण करून भावजयचा खून केल्याची खळबळजनक घटना राहाता शहरात १५ चारी हद्दीत घडली. यात सविता लहानु पवार (वय ४०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी राहाता पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केले. राहाता शहरात १५ चारी हद्दीत प्रकाश जगताप यांचे पेरूच्या शेतात आदिवासी समाजाचे हे कुटुंब बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवार व इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते. नंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन पवार याचे व मयत सविता पवार या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणामध्ये काहीतरी टणक वस्तूने डोक्यात कानशिलाजवळ मारहाण केल्याने सविता हिचा मृत्यू झाला. मयत सविताच्या डोक्यावर कानशिलालगत गंभीर इजा झाल्याने तसेच छातीवर जखमा झाल्याने त्यात ती मृत पावली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तेथे सविता मृत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी हा तेथून फरार झालेला होता. नंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवत आरोपीला काही तासाच्या आत अटक केली. सविताचा खून नेमका कोणत्या कारणाने केला, त्यामागचे इतर कारणे काय, याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल. शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार यांचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.