भेदभाव न करता विकासाची कामे केली – आमदार राजळे

शेवगाव – गेली दहा वर्षांपासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्हीही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला. मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील मुंगी, दहिगाव- शे, बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या मार्गाच्या कामासाठी १३ कोटी ६० लाख रुपये निधीच्या विविध कामाचा भूमिपूजन समारंभ आ .राजळे यांचे हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आ. राजळे म्हणाल्या, थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने विरोधक फक्त निवडणुकीसाठी बाहेर पडले असून कुणी शिवार फेरी तर कुणी जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून तुम्हाला भुलवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका. राज्य शासनाने राज्यातील महिला व पुरुषांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन या योजनेपासून एकही नागरिक वंचित रहाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आ. राजळे यांनी केले. यावेळी शिवाजी समिंदर, श्रीरंग गोर्डे, भाजपचे माजी तालुका प्रमुख बापूसाहेब पाटेकर यांनी आपले विचार मांडले.





